७०१ कोटी रुपयांचा विकास आराखडा प्रकल्प तयार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. या प्रसंगी ह.भ.प. शांतीब्रम्ह मारुती महाराज कुऱ्हेकर, आमदार उमा खापरे, शंकर जगताप, बाबाजी काळे, प्रमुख जिल्हा व पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, ॲड. रोहणीताई पवार, पुरुषोत्तम पाटील, निलेश महाराज लोंढे, आळंदी ग्रामस्थ, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
ज्ञानपीठ आपल्या हातून व्हावे हे ईश्वराची योजना असावी आणि त्याचे समाधानाही असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, ज्ञानपीठ तयार करण्यासाठी ७०१ कोटी रुपयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय अध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल. इंद्रायणी नदीचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. हा आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल. याद्वारे पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेसह ३९ गावातील पाणी शुद्ध करून इंद्रायणीत जाईल. इंद्रायणी नदीचे जल स्वच्छ, निर्मळ आणि पुजनीय होईल असा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.
ह.भ.प. शांतीब्रम्ह गु. मारुती महाराज कुऱ्हेकर यांनी भागवत धर्म प्रचारासाठी केलेले कार्य लक्षात घेता त्यांना पद्म पुरस्कार मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, सोहळ्याचे निमित्ताने वारकऱ्यांच्या रूपातील पांडुरंगाचे दर्शन करण्याची संधी मिळाले. अशी भावना व्यक्त करतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात परकीय आक्रमण होत असताना भागवत धर्माला जिवंत ठेवण्याचे कार्य वारकरी संप्रदायाने आणि संतांनी केले. त्यामुळे आपला विचार, संस्कृती आणि धर्म कोणीही नष्ट करू शकला नाही. परकीय आक्रमणा च्यावेळी संत समाजात सुविचार रुजवत होते. त्यामुळे चांगल्या विचारांची परंपरा आजही सुरू आहे.
जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे संतांचे कार्य
संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढविला. संतांची ही मोठी परंपरा आपल्या देशाला लाभली आहे. जात, पंथ, धर्म विरहित समाज निर्माण करण्याचे कार्य संतांनी केले. वारकरी प्रत्येकात पांडुरंग पाहतो. वारकारी संप्रदायने रुजविलेल्या परंपरेमुळे राज्य अग्रेसर आहे.
भौतिक प्रगतीमुळे शांती मिळत नाही तर मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. संत परंपरेमुळे, त्यांनी दिलेल्या अध्यात्मिक विचारमुळे समाजाचे मानसिक स्वास्थ्य चांगले आहे. प्रत्येक गावातील भागवत सप्ताहामुळे हा विचार सर्वदूर पोहोचविण्यास मदत होत आहे. अध्यात्मिक बैठकीशिवाय मनःशांती मिळत नाही. या अर्थाने जगातील सर्वात श्रीमंत देश भारत आहे आणि ही श्रीमंती संतांनी टिकवली असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
वारीत स्वयंशिस्त असते, वारी करणाऱ्यांच्या जीवनात वेगळा आनंद निर्माण होतो. गितेतला विचार वारीद्वारे रुजविण्याचा प्रयत्न होतो. ज्ञानेश्वर माऊलींनी गितेतील हा विचार ज्ञानेश्वरीच्या रूपाने मराठीतून मांडला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाविताना ज्ञानेश्वरी ग्रंथ उदाहरण म्हणून प्रस्तुत करण्यात आला, असेही श्री. फडणवीस म्हणाले. अशा अध्यात्मिक सोहळ्याच्या माध्यमातून विचारांचे वैभव पुन्हा प्रस्थापित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
योगी निरंजननाथ यांनी प्रस्ताविकात सोहळ्याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाङ्मयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या 'नमो ज्ञानेश्वरा' या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच याच पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात अन्नदान करणाऱ्या जगताप कुटुंबियांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माऊली मंदिरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्रींची तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माऊली मंदिरात दर्शनास
श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, 'पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त श्री योगी निरंजननाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे, डॉ भावार्थ देखणे, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर देवस्थान तर्फे मुख्यमंत्र्यांचा तुळशीची हार , माळ देऊन सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आळंदीत स्वागत
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव वर्षा निमित्त आळंदी आयोजित सोहळ्याचे सांगतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत आले होते. त्यांचे स्थानिक प्रशासन तर्फे स्वागत करण्यात आले. आळंदी येथील हेलिपॅडवर आगमन प्रसंगी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रशासना तर्फे त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी खेडचे आमदार बाबाजीशेठ काळे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी आदी अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. आळंदीत कोणत्याही प्रकारचे आंदोलन नव्हते. तरी देखील आळंदी पोलिसांनी सामाजिक कार्यकर्त्यांना धार्मिक कार्यक्रमा पासून वंचित ठेवले. आळंदी देवस्थानने कोणत्याही प्रकारची ओळख पात्र पत्रकारांना देण्याची व्यवस्था केली नाही. या कार्यक्रमास आत जाताना पत्रकारांनाही जाण्यास कसरत करावी लागली. कोणत्याही प्रकारचे आंदोलन नदीचे अनुषंगाने आळंदीत नव्हते. आळंदी येथील मुख्यमंत्री यांचा दौरा व सोहळा उत्साही हरिनाम गजरात पार पडला.
अन्नदान महाप्रसाद सेवा रुजू
आळंदी ग्रामस्थांचे वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पारायण वाचकांना सन्मानपत्र आणि पसायदान भेट देण्यात आले. आळंदी ग्रामस्थांचे वतीने मुक्तद्वार अन्नदान महाप्रसादाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. पहिला आणि शेवटचा डायस अशा दोन दिवसांचे महाप्रसाद वाटप आळंदी ग्रामस्थानी केले. तर सलग ६ दिवस आमदार शंकर जगताप, विजय जगताप यांचे परिवार तर्फे महाप्रसाद वाटप सेवा रुजू करण्यात आली. आळंदी ग्रामस्थ, आळंदी देवस्थान यांचे सुसंवादातून सप्ताहाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
आळंदी प्रभावी पोलीस बंदोबस्त
आळंदीत आयोजित अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यात कायदा सुव्यवस्था, शांतता सुव्यवस्था, वाहतुकीचे सुरळीत नियोजन, व्यवस्थापन यासाठी आळंदी व दिघी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमाजी नरके, दिघी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापूसाहेब ढेरे, आळंदी दिघी वाहतूक पोलीस शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे आणि सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रभावी पणे पोलीस बंदोबस्त तैनात करीत परिश्रम पूर्वक काम पाहिले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
Post a Comment
0 Comments