यशस्वी शस्त्रक्रिया ; श्रीपाल हॉस्पिटल बारामती
बारामती / वर्षा चव्हाण : साडेसहा महिन्याच्या एका बाळाच्या जीवावर बेतलेली अत्यंत धोकादायक घटना बारामतीतील श्रीपाल हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या वेळीच केलेल्या कौशल्यपूर्ण उपचारांमुळे टळली.
बाळाच्या घशात आणि श्वसन नलिकेत – म्हणजेच स्वरयंत्रामागील कंठातील ( laryngopharynx ) भागात – तब्बल ३ .५ सेंटीमीटर लांबीचे आणि एका बाजूने धारदार असलेले सोन्याचे कानातले अडकले होते. त्यामुळे बाळाला श्वास घेणे कठीण होऊ लागले. तोंडातून रक्तस्राव होऊ लागल्याचे लक्षात येताच घाबरलेल्या पालकांनी तातडीने श्रीपाल हॉस्पिटल, भिगवण रोड, बारामती येथे धाव घेतली.
बाळाची अवस्था गंभीर होती. त्याचे प्राण धोक्यात आले होते. याच वेळी बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा, आणि डॉ. प्रियांका मुथा, तसेच नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. वैभव मदने आणि भूलतज्ज्ञ डॉ. अमर पवार यांनी एकत्र येऊन तात्काळ आणि अत्यंत जोखमीची स्कोपी शस्त्रक्रिया सुरू केली.
कौशल्य आणि समन्वयाने करण्यात आलेल्या या अत्यंत संवेदनशील शस्त्रक्रियेमध्ये, बाळाच्या घशातून धारदार कानातले दुर्बिणीद्वारे यशस्वीरित्या काढण्यात आले. सर्व प्रक्रिया काही मिनिटांत यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आणि बाळाचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.
डॉक्टरांच्या या तातडीच्या निर्णयाने आणि चिकाटीमुळे बाळाला मरणाच्या दारातून परत आणले गेले. यानंतर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये आणि बाळाच्या पालकांमध्ये सुटकेचा निश्वास होता.
बाळाचे पालक म्हणाले, "श्रीपाल हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांच्या वेळीच झालेल्या प्रयत्नांमुळे आमच्या बाळाचा जीव वाचला."
ही घटना डॉक्टरांच्या तत्परतेचा आणि सामूहिक प्रयत्नांचा एक उल्लेखनीय नमुना ठरली आहे. बारामतीमधील वैद्यकीय क्षेत्रातील हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायक आहे.

Post a Comment
0 Comments