कृष्ण जन्म सोहळ्यात हरिनाम जयघोषात ज्ञानेश्वरी पारायण
वडमुखवाडीतील अखंड हरीनाम सप्ताहात महिला कीर्तन महोत्सवाची सांगताआळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट तर्फे ९ ते १६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत श्री ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांचे सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.
कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७५० वा जन्मोत्सव राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात विविध उपक्रमांनी साजरा झाला. या निमित्त वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमेची दिंडी मिरवणूक झाली. यावेळी महिलांनी श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी डोक्यावर घेऊन दिंडी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात केली. यावेळी मंदिरात दीपोत्सव उत्साहात झाला. या प्रसंगी दीप प्रज्वलन अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांचे हस्ते झाले. यावेळी श्रीकृष्ण व माऊली जन्मोत्सव साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमाचे आयोजन हरिनाम गजरात करण्यात आले. यामध्ये जन्मोत्सवा निमित्त ह. भ. प. चांगुणाताई चौधरी यांची सुश्राव्य कीर्तन सेवा रुजू झाली. ह. भ. प.ज्ञानेश्वरी ताई जगताप यांच्या काल्याचे कीर्तनाने महिला कीर्तन महोत्सवाची सांगता झाला. या वेळी जगताप महाराज म्हणाल्या, संतांच्या संगतीने परमात्मा मिळतो. संत हे परमात्म्याचे प्राप्तीसाठी मधला दुवा आहे. संत हे जीवशिव यांचे ऐक्य घडवून आणतात. अविनाशी परमात्म्याची ओळख करून देतात. असे त्यांनी कीर्तन सेवेत सांगितले.
यावेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, मनोहर भोसले, रमेश महाराज घोंगडे, राजेंद्र नाणेकर, किरण बारोकर,राजाराम साठे महाराज, शांताराम तापकीर आदी मान्यवर तसेच वारकरी, भाविक, महिला, ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कीर्तन महोत्सवाची सांगता पसायदानाने झाली. भाविकांना महाप्रसाद वाटप उत्साहात करण्यात आले.
थोरल्या पादुका मंदिर पंचक्रोशीतील सर्व महिला मंडळ व स्वकाम सेवेकरी यांनी भाविक नागरिकांना विशेष सेवा रुजू केली. या धार्मिक पर्वणीस परिसरातील भाविकांनी मोठा प्रतिसाद दिल्याने उत्सव यशस्वी झाल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर यांनी सांगितले.


Post a Comment
0 Comments