Type Here to Get Search Results !

Maharashtra उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत २५ ऑगस्ट पर्यंत सहभागी होण्याचे आवाहन

                                                  गणपतींचे ऑनलाइन थेट ( लाईव्ह ) दर्शन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आलेल्या गणेश महोत्सवांतर्गत महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट २०२५ पर्यंत असून नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले आहे. 

  ही स्पर्धा विनामूल्य असून राज्य, जिल्हा व तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या https://www.pldeshpandekalaacademy.org या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टलद्वारे ऑनलाइन स्वरुपात स्वीकारले जाणार आहेत. विजेत्या मंडळांना तालुका स्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. 

  या सोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपती, सार्वजनिक गणपती व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे ऑनलाइन थेट ( लाईव्ह ) दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या https://ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलवर विनामूल्य प्रसिद्ध करता येतील. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  स्पर्धेत सहभागी मंडळांचे विविध स्पर्धा, सांस्कृतिक उपक्रम, गड किल्ले संवर्धन, राज्य व राष्ट्रीय स्मारकांचे जतन, विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, देशी खेळांचे संवर्धन व प्रचार प्रसार, आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध विषयांवरील कार्य, कायम स्वरूपी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वाचनालय, महिला सक्षमीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विज्ञानाच्या प्रचार व प्रसिद्धीचे कार्य, नवसंशोधन, पर्यावरण पूरक मूर्ती, सजावट व प्रदूषण रहित वातावरण अशा विविध बाबींच्या आधारे परीक्षण केले जाणार आहे, असे पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालक मीनल जोगळेकर यांनी कळविले आहे. 

Post a Comment

0 Comments