Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत पत्रकार दिन उत्साहात ; माऊलींच्या चरणी नतमस्तक ; सिध्दबेटात अजानवृक्ष पूजा

 आळंदीत पत्रकार दिन उत्साहात ; माऊलींच्या चरणी नतमस्तक ; सिध्दबेटात अजानवृक्ष पूजा 



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने 'पत्रकार दिना'चे औचित्य साधून तीर्थक्षेत्र अलंकापुरीत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या पादुकांचे पूजन आणि सिद्धबेटात अजानवृक्ष पूजा करीत वृक्ष संवर्धनाचा संकल्प करून पत्रकार बांधवांनी हा दिवस साजरा केला. 

माऊलींच्या चरणी वेदमंत्रांचा जयघोष

मंगलमय वातावरणात सकाळी सात वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात माऊलींच्या चल पादुकांची पूजा करण्यात आली. वेदमूर्ती प्रफुल्ल प्रसादे यांच्या पौरोहित्याखाली वेदघोषाच्या स्वरात हा विधी संपन्न झाला. या वेळी श्रींचे दर्शन घेऊन श्री गणेश मंदिर मंडप येथे आरती करण्यात आली. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ अध्यक्ष अर्जुन मेदनकर, जिल्हा प्रतिनिधी अमर गायकवाड यांनी उपक्रमाचे संयोजन केले. या वेळी पत्रकारांनी समाजहिता साठी आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेसाठी माऊलींकडे आशीर्वाद मागितले.

सिद्धबेटावर वृक्ष संवर्धनाचा जागर

मंदिरातील पूजेनंतर सकाळी आठ वाजता पत्रकार बांधवांनी श्री संत लीला भूमी सिद्धबेट येथे भेट दिली. या ठिकाणी पवित्र अजानवृक्षाची पूजा करण्यात आली. सिद्धबेटाची पाहणी करतानाच निसर्ग संवर्धन आणि वृक्ष संगोपना बाबत उपस्थित मान्यवरांमध्ये सविस्तर चर्चा झाली. पत्रकारिता करतानाच सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पर्यावरण रक्षणासाठी कार्य करण्याचा निर्धार गेल्या चार वर्षा पूर्वी करण्यात आला होता. त्या कामाची माहिती यावेळी अर्जुन मेदनकर यांनी देत सिद्धबेट येथे वृक्षारोपण, संवर्धन, पर्यावरण रक्षणाचे कार्य सुरू आहे. येत्या काळात ५ हजार वृक्ष लावण्यात येत असून यासाठी तयारी नियोजन सुरु आहे. येथील हरित संपदा संवर्धन होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचे स्वागत आणि पत्रकार दिनाच्या हार्दिक  शुभेच्छा दिल्या. हुतात्मा राजगुरू पत्रकार संघाच्या वतीने आलेल्या पाहुण्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आळंदीतील कार्यक्रमा नंतर पत्रकार नियोजित मुंबई दौऱ्यासाठी रवाना झाला. या उपक्रमा मुळे पत्रकारिते सोबतच अध्यात्म आणि पर्यावरण रक्षणाचा एक सुंदर संगम आळंदीत पाहायला मिळाला.

Post a Comment

0 Comments