आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन मा डॉ बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी व मा डॉ अतुल शंकरवार जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला व मा डॉ.आशिष गिऱ्हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी, म.न.पा. अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या वर्षीच्या जागतिक हिवताप दिनाची घोषवाक्य "चला हिवतापाला संपवूयाः पुन्हा योगदान द्या, पुनर्विचार करा, पुन्हा सक्रिय व्हा" अशी असून, यानुसार जनतेमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. रॅलीमध्ये नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय
अधिकारी डॉ. नितीन गायकवाड सर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सर्व कर्मचारी व इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकोला नर्सिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आरोग्य सेविका सोनल तायडे, कल्पना बोबडे , प्रिया हागोणे , आरोग्य सेवक श्री. करण घुगे, राजेश आसोले, विनोद मनोहरे प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री. अंकुश धूड औषध निर्माता श्रीमती मोनिका रायसिंग व आशावर्कर तसेच इतर कर्मचारी होते.
रॅलीची सुरुवात नागरी आरोग्य केंद्र हरिहरपेठ येथून करण्यात आली. "गप्पी मासे पाळा , हिवताप टाळा", "येता कण कण तापाची , करा तपासणी रक्ताची" अशा घोषणांनी शहरातील नागरिकांमध्ये प्रबोधन करण्यात आले. रॅली हरिहरपेठ येथील मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत नागरिकांना स्वच्छतेचे व हिवताप प्रतिबंधक उपाययोजनांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या प्रसंगी डॉ. नितीन गायकवाड यांनी हिवतापाची कारणे, लक्षणे व प्रतिबंधक उपायांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, "हिवताप होण्याचे मुख्य कारण डासांची वाढ होय. त्यामुळे आपल्या परिसरात स्वच्छता राखणे, पाणी साचू न देणे, झाकण असलेल्या भांड्यांमध्येच पाणी साठवणे, नियमित फॉगिंग करणे आणि अति ताप आल्यास तातडीने आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे आवश्यक आहे." तसेच, त्यांनी हिवतापाच्या निदान व उपचारासाठी सरकारी रुग्णालयांत मोफत सेवा उपलब्ध असल्याचेही सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व कर्मचाऱ्यांनी आणि विद्यार्थ्यांनी हिवताप निर्मूलनासाठी पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा केली. नागरिकांनी देखील रॅलीला सकारात्मक प्रतिसाद दिला.


Post a Comment
0 Comments