Type Here to Get Search Results !

alandi आळंदी सप्ताहास १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे टाळ देवस्थानला सुपूर्द

गलांडे पाटील परिवाराचा स्तुत्य उपक्रम  



आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदीत ३ ते १० मे २०२५ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होत आहे. या सोहळ्यातील दोन सत्रात कीर्तन महोत्सव होणार आहे. या कीर्तनातील टाळक-यांसाठी १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे ७१ टाळ आळंदी देवस्थानला श्रींचे समाधीस स्पर्श करीत भक्तिमय उत्साहात सुपूर्द करण्यात आले. 



      आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आळंदीत विविध धार्मिक कार्यक्रम सप्ताहात होत असल्याचे सांगितले. यावेळी गलांडे पाटील यांनी आम्हाला या सप्ताहात सेवेची संधी मिळावी अशी भावना व्यक्त केली. यावर सप्ताहचे अनुषंगाने माऊली मंदिराचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचेशी चरित्र समिती अध्यक्ष काळे यांनी संपर्क करून आवश्यक माहिती जाणून घेतली. यावर सप्ताहातील कीर्तन प्रसंगी टाळ उपलब्ध करून देण्यास सुचविले. वडगावशेरीतील गलांडे पाटील परिवाराने थेट अहिल्यानगर येथील टाळ निर्मिती उत्पादकांशी संपर्क करून १ लाख १५ हजार रुपये किंमतीचे खणखणीत आवाजाचे टाळ तात्काळ उपलब्ध करून माऊली मंदिराचे मुख्य व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांचे कडे माऊली भक्त ज्ञानेश्वर गलांडे पाटील, राजाभाऊ गलांडे पाटील, रंगनाथ गलांडे पाटील, अप्पासाहेब गलांडे पाटील यांनी ७१ टाळ सुपूर्द केले. या निमित्त आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा यांचे हस्ते गलांडे परिवारासह चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांचा सत्कार करण्यात आला. श्रींचे ७५० व्या जन्मोत्सवी वर्षा निमित्त आयोजित उत्सवात ३ ते १० मे २०२५ या काळात होत असलेल्या सप्ताहात सर्वानी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी केले आहे. या निमित्त कार्यक्रम स्थळी जोरदार तयारी सुरु असून मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली असून शहरात सर्वत्र स्वागत कमाणी उभ्या होत आहे. यासाठी मंडप स्थळावर तयारीचा आढावा जेष्ठ अनुभवी माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक घेत आहेत. आळंदीत ८ दिवस पंचक्रोशीतील नागरिक, भाविक यांना मोठी ज्ञानयज्ञ पर्वणी लाभत आहे. आळंदीकर ग्रामस्थ आणि आळंदी देवस्थान भाविकांचे स्वागत सज्ज झाले आहे. आळंदी नगरपरिषद देखील शासकीय स्तरावरून सर्वोतोपरी सहकार्य आणि नागरी सेवा सुविधा भाविकांना उपलब्ध करून देत असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.     

Post a Comment

0 Comments