हरीनाम जयघोषात बहुरूपी भारुडास वैष्णवांचा प्रतिसाद
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : कैवल्य साम्राज्य ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख डॉ भावार्थ देखणे, आळंदीतील अभिनेते अवधूत गांधी आणि ३५ कलाकारांचे साहाय्याने बहुरूपी भारूड या लोककलेतुन अध्यात्माची पेरणी करीत भारूड हरिनाम गजरात सादर करण्यात आले. यास हजारॊ भाविकांनी उत्साही प्रतिसाद देत नामजयघोष केला.
आळंदीत ३ ते १० मे या कालावधीत सुरु असलेल्या सप्ताहात श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाची पर्वणी भाविक, नागरिक, वारकरी यांना लाभली आहे. या सप्ताह सोहळ्यात बहुरूपी भारूड सादरकर्ते डॉ. भावार्थ देखणे, अवधूत गांधी, अभय नलगे, प्रसाद भांडवलकर , प्रियांका ढेरंगे चौधरी, कल्याणी शेटे यांच्यासह ३० कलाकारांनी विविध वारकरी संप्रदायातील अभंग, दिंडी , वासुदेव , कडक लक्ष्मी, गोंधळ आदी पारंपारिक लोककलेतुन धार्मिक बैठक देण्याचे दृष्टीने अध्यात्माचे महत्त्व विशद करीत उपस्थितांचे लक्ष वेधले.
राज्यात भारुड या लोककलेस फार महत्त्व आहे. भारूड हि सांस्कृतिक पारंपरिक लोक कला आहे. भारूडाचे माध्यमातून आध्यात्मिक प्रबोधन, सामाजिक संदेश, संगीत, कविता, नाटक या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. संत एकनाथांनी खूप भारुडे लिहिलेली आहेत. या माध्यमातून त्यांनी अनेक विषयावर प्रकाश टाकला आहे. भारुड हे समाज प्रबोधनाचे एक मोठं व्यासपीठ आहे. लोकांना धार्मिक आणि नैतिक विचार समजतात. ही विचारधारा समाज मनात रुजविण्याचे काम डॉ भावार्थ देखणे, अवधूत गांधी यांचेसह कलाकारांनी केले. या बहुरूपी भारुडास मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बहुरूपी भारूड सादर केलेले भावार्थ देखणे, अवधूत गांधी यांचे कलेस हजारो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आळंदी देवस्थान, आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने बहुरूपी भारूड कलाकानी सादर करून विविध सामाजिक, धार्मिक बाबींवर प्रकाश टाकला, देवस्थान तर्फे सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आमदार बाबाजी काळे, रोहित पवार यांनी सप्ताह स्थळी भेट दिली. संस्थान तर्फे आमदार बाबाजी काळे, रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला.


Post a Comment
0 Comments