स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.0 अंतर्गत औपचारिक सामंजस्य करार (MoU)
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.0 अंतर्गत गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने (MOHUA) सुरू केलेल्या ‘स्वच्छ शहर जोडी’ या अभिनव उपक्रमात आळंदी नगरपरिषद आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यात औपचारिक सामंजस्य करार (MoU) करण्यात आल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.या उपक्रमाचा हेतू मध्ये योजनेत उन्नत व सिद्ध कामगिरी असलेल्या शहरांनी (Mentor City) इतर शहरांना (Mentee City) मार्गदर्शन करून स्वच्छता व्यवस्थापन, नागरिक सहभाग व कचरा प्रक्रियेत सुधारणा घडवून आणत पुढील १०० दिवसांत, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही आळंदी नगरपरिषदेला तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण व SOPS उपलब्ध करून देणार आहे.
प्राथमिक लक्ष केंद्रे यामध्ये भागीदारीतून आळंदीत खालील ८ क्षेत्रांत सुधारणा घडवली जाणार आहे. यामध्ये दृश्यमान स्वच्छता – कचरा असुरक्षित ठिकाणांचा नायनाट व सार्वजनिक ठिकाणांचे नवीनीकरण. कचरा संकलन व वर्गीकरण – १००% घरगुती संकलन व स्रोतावर वर्गीकरण. घनकचरा प्रक्रिया – कंपोस्टिंग, MRFs आणि जुन्या कचऱ्याचे व्यवस्थापन. सार्वजनिक स्वच्छता सुविधा – स्वच्छ, सुलभ व कार्यक्षम शौचालये. पाणी व मलमूत्र व्यवस्थापन – राखाडी पाणी व ड्रेनेज सुधारणा. यांत्रिक स्वच्छता व कर्मचाऱ्यांचे कल्याण – PPE, आरोग्य तपासण्या व विमा. वर्तन बदल मोहिमा – नागरिक जनजागृती व प्रशिक्षण आणि यासाठी नागरिक सहभाग – तक्रार निवारण यंत्रणा व स्मार्ट हेल्पलाईन्स विकसित करणे यांचा समावेश आहे.
यातून अपेक्षित परिणाम मार्च २०२६ पर्यंत आळंदी नगरपरिषदेत सर्व ८ क्षेत्रांत मोजता येण्याजोगी सुधारणा, शहरात दृश्यमान स्वच्छता आणि नागरिक समाधानात वाढ, स्वच्छ सर्वेक्षण २०२६ मध्ये रँकिंग सुधारणा होईल.
या संदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह (IAS) म्हणाले, “स्वच्छ शहर जोडी हा भारतातील शहरी स्वच्छतेला नवीन दिशा देणारा उपक्रम आहे. आळंदी नगरपरिषदे सोबत मिळून शाश्वत व स्वच्छ शहर निर्माण करणे हे या कराराचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मार्गदर्शनामुळे आळंदीत शाश्वत स्वच्छतेसाठी मोठे बदल घडवून आणण्याची आम्हाला खात्री असल्याचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले.
हा उपक्रम स्वच्छ भारत मिशन-अर्बन २.० च्या दृष्टीला बळकट करत भारतातील शहरे अधिक स्वच्छ, हरित व नागरिक - उत्तरदायी बनवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल असा निष्कर्ष असल्याचे आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले:

Post a Comment
0 Comments