प्रयोगशाळेचे अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण लोकार्पण ; साडे अठरा लाख रुपये खर्च
आळंदी - देहू ( अर्जुन मेदनकर ) : येथील देहूतील हिल्टी टेक्नॉलॉजी सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सी.एस.आर फंडातून देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयाची विज्ञान प्रयोगशाळा अत्याधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात आली. या साठी कंपनीच्या सी.एस.आर. फंडातून साडे अठरा लाख रुपये खर्च करण्यात आले, या प्रयोगशाळेचे उद्घाटन कंपनी फायनान्स हेड अर्चना देशमुख यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी दत्तात्रय गायकवाड, सी.एस.आर. चेअरमन नंदिष पलगट्टी, थोर देणगीदार नारायण मोरे, हिल्टी कंपनीचे अमित समतानी, मोहित अगरवाल, गिरीश पाटील, संतोष दरेकर, पोशिका गुप्ता, नेहा लोमटे, सचिन पोरे, विजय भोसले, प्रांजली कुलकर्णी, मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर, पर्यवेक्षिका मनीषा निकम आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आकांक्षा मंडावत, भक्ती होळकर या विद्यार्थिनींनी कंपनीच्या योगदाना बद्दल मनःपूर्वक आभार मानले. शिक्षकां तर्फे शिवराज तांबे यांनी “सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळे मुळे विद्यार्थिनीं मध्ये प्रयोग करण्याची गोडी निर्माण होईल. विज्ञान विषयाबद्दल आत्मविश्वास वाढेल,” असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्ट, प्रयत्नशीलता व ध्येयवादी दृष्टिकोन यांचे महत्त्व पटवून दिले. प्रांजली कुलकर्णी यांनी “कष्टाला पर्याय नाही, प्रयत्न आणि चिकाटीनेच यश मिळते,” असा संदेश दिला. तर सी.एस. आर . चेअरमन नंदिष पलगट्टी यांनी विद्यार्थ्यांना “स्वप्न पाहा, ध्येय ठरवा आणि ते गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा,” असा प्रेरणादायी सल्ला दिला.
रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील मोठी शैक्षणिक संस्था असून अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधांची कमतरता असल्याचे नमूद करून, कंपन्यांनी सी.एस.आरच्या माध्यमातून अधिकाधिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहन या वेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निवेदिता पासलकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनील घुमटकर, मीनल साकोरे यांनी केले. आभार पर्यवेक्षिका मनीषा निकम यांनी मानले.

.jpeg)
Post a Comment
0 Comments