Type Here to Get Search Results !

Alandi आळंदीत एकादशी निमित्त माऊलींचे पालखीची ग्राम प्रदक्षिणा

इंद्रायणी आरती हरिनाम गजरात  


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : प्रबोधिनी एकादशी निमित्त आळंदी मंदिरासह अलंकापुरीत माऊलींचे पालखीची नामजयघोषात प्रदक्षिणा करण्यात आली.आळंदी पंचक्रोशीतून माऊलींचे दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी गर्दी केली. आळंदीत विविध उपक्रमांनी एकादशी साजरी झाली. इंद्रायणी आरती हरिनाम गजरात उत्साहात झाली.  

  एकादशीचे प्रथा परंपरा कायम ठेवत माउलींच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. प्रदक्षिणा रस्त्याचे दुतर्फा भाविकांनी श्रींचे दर्शन घेण्यास गर्दी केली. हजेरी मारुती मंदिर मार्गे इंद्रायणी नदी किनारा मार्गे श्रींची पालखी खांद्यावर हरिनाम गजरात मिरवीत ग्रामस्थ भाविकांनी मंदिरात आणली. मंदिरात प्रदक्षिणा झाल्यावर प्रमुख मानकरी व सेवकांना नारळ प्रसादाचे वाटप करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर, उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले. मंदिरात विविध कार्यक्रम झाले. यामध्ये श्रींची पूजा, आरती, उपवासाचा फराळाचा महानैवेद्य, धुपारती आदींचा समावेश होता. श्रींचे पालखी प्रदक्षिणा प्रसंगी आळंदी देवस्थानचे पदाधिकारी, व्यवस्थापक माऊली वीर, मानकरी कुऱ्हाडे पाटील, मालक ऋषिकेश पवार आरफळकर, मंगेश आरु,  चोपदार सेवक अवधूत रणदिवे, देवस्थानचे पुजारी, बल्लाळेश्वर वाघमारे आदी  उपस्थित होते. मानकरी व सेवकांना देवस्थान तर्फे नारळ प्रसाद परंपरेने वाटप करण्यात आले.

   तीर्थक्षेत्र आळंदी ग्रामस्थ इंद्रायणी आरती ग्रुप संयोजक अर्जुन मेदनकर, संयोजक राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अनिता झुजम, महिला बचत गट महासंघ अध्यक्षा सुवर्णा काळे, पुणे जिल्हा वंचित विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष संदीप रंधवे, उमेश बिडकर, उपशहर प्रमुख माऊली घुंडरे पाटील,   गोविंद ठाकूर, विठ्ठल गिरी महाराज. राजेंद्र जाधव, महिला सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर घाट  स्वच्छता करीत इंद्रायणीची आरती हरिनाम गजरात झाली. कार्तिकी तील प्रबोधिनी एकादशी दिनी इंद्रायणी आरती करून स्वच्छता करीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली.

स्वकाम सेवा मंडळाची पंढरपूर परिसरात स्वच्छता 

  कार्तिकी यात्रा २०२५ निमित्त पंढरपूर सेवेसाठी २०० सेवक रवाना झाले आहेत. पंढरपूर कार्तिकी एकादशी निमित्त यात्रा काळात तीन ग्रुप मधून सेवेसाठी स्वच्छतादूत सेवक रवाना झाले आहेत. पंढरपूर मंदीर व मंदीर परीसर, मंदीर ते पत्रा शेड दर्शन २४ तास स्वच्छ्ता ठेवण्याचे कार्य तसेच प्रसाद लाडू पॅकींग साठी मदत केली जात असल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले. नगर निवासी श्री क्षीरसागर महाराज यांच्या प्रेरणेने संस्थापक डॉ. सारंग जोशी यांनी १७ नोव्हेंबर १९९६ रोजी स्वकाम सेवा मंडळाची सेवा सुरू केली. यासाठी अध्यक्ष सुनिल तापकीर, महिला विंग अध्यक्षा आशा तापकीर यांनी प्रभावी नियोजन केले आहे. या साठी स्वकाम सेवेचे तिन्ही ग्रुप पंढरपूर सेवेत सेवारत असल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.  

Post a Comment

0 Comments