आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी हे राज्यातील महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. येथे राज्यासह परिसरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. भाविक आणि स्थानिक नागरिकांना नागरी सेवा सुविधा देत प्राधान्याने विकास कामे मार्गी लावण्यास तसेच आळंदी शहर विकासास आपण बांधील राहू असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
आळंदी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतील भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे आणि नगरसेवक पदाच्या उमेदवार यांचे प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, उमा खापरे, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, नगराध्यक्षाचे उमेदवार प्रशांत कुऱ्हाडे, नगरसेवक पदाचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते. या वेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, राजेंद्र गिलबिले, तुषार घुंडरे आदींनी भाजप मध्ये प्रवेश केला.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, तीर्थक्षेत्र आळंदी शहराचा प्राधान्याने विकास करण्यासाठी भाजपाला साथ द्या. येथील नागरिकांचे साठी विविध सेवा सुविधा देत शहराचा अधिक विकास साधण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी या पूर्वी उपलब्ध करून दिला आहे. अधिक भरीव निधी देऊन भाविक, नागरिकासाठी दर्जेदार नागरी सुविधा दिल्या जातील आळंदी सह राज्यातील ४०० शहरे विकसित करायची असून कोट्यावधी जनतेच्या विकासासाठी बांधिलकी असल्याचे सांगत प्रचार सभेत येथील विकास कामांचा आढावा घेत अत्याधुनिक विकास साधने हे राज्य शासनाचे लक्ष असून केंद्र आणि राज्य शासन मिळून येथील नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांचे माध्यमातून येथील विकास कामे मार्गी लावली जातील असे सांगितले. लाडकी बहीण आता लखपती बहीण होण्यासाठी योजना आणली असून जास्तीत जास्त महिलांना लखपती बहीण बनविण्यासाठी या पुढील काळात काम केले जाणार आहे.
लाडकी बहीण योजना जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत बंद होणार नाही अशी ग्वाही त्यांनी या वेळी बोलताना दिली. येथील वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण पाणी पुरवठा अधिक प्रभावी करण्यासाठी निधी, स्वच्छता, स्मार्ट सुविधा यांचे माध्यमातून आळंदीसह राज्यातील सुमारे ४०० शहरे विकसित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करताना नागरिकांनी हि मोठा प्रतिसाद दिला. उत्स्फुरद गर्दीनी प्रचार संवाद सभा शांततेत पार पडली.
येथील सभेस आळंदी पोलिसांनी बंदोबस्त प्रभावी तैनात केला होता. या साठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे यांनी परिश्रम पूर्वक काम पाहिले. आळंदीत प्रचाराची रणधुमाळी थांबली असून मंगळवारी ( दि. २ ) मतदान आणि बुधवारी ( दि. ३ ) आळंदीत मतमोजणी होणार आहे. मतदान आणि मतमोजणी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात रहाणार आहे. आळंदीत नगरपरिषद निवडणूक असल्याने मंगळवारी ( दि. २ ) आळंदीत जड, अवजड वाहने प्रवेश बंद असून आळंदीत थेट प्रवेश न करता वाहन चालकांनी ये - जा करण्यास पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सुचविले आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत वाहने आळंदी शहरात न आणता पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन वाहतूक पोलीस प्रशासनाने केले आहे.

Post a Comment
0 Comments