Type Here to Get Search Results !

Alandi "इतिहास, डेटा सायन्स आणि एआय: भूतकाळाला भविष्याची नवी दिशा"

पुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख लेखक मार्गदर्शन 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : भारताचा इतिहास म्हणजे पानोपानी जपून ठेवलेली असंख्य कथा, परंपरा आणि संस्कृतींचा खजिना. देशाच्या प्रत्येक भागात गेल्यावर आपल्याला कुठेतरी एखाद्या प्राचीन शहराचा ठसा सापडतो, तर कधीकधी एखाद्या मंदिराच्या भग्न शिल्पातून त्या काळातील कलाकारांची कौशल्यपूर्ण कलावंतता दिसते. मातीची भांडी, जुनी नाणी, शिलालेख, गुहा-चित्रे किंवा किल्ल्यांचे उरलेले भाग ही सर्व वस्तू जणू आपल्याशीच संवाद साधत भूतकाळातील कथा सांगू लागतात. सिंधू संस्कृतीपासून मराठा साम्राज्या पर्यंत अनेक युगांची परंपरा या अवशेषांत गुंफलेली आहे, आणि हीच संपत्ती आजही आपल्याला इतिहासाचा नवा शोध घ्यायला प्रेरित करते.

  इतिहासाचा हा प्रवास डेटा सायन्सच्या म्हणजेच विज्ञानच्या मदतीने अधिक अर्थपूर्ण होतो  कारण इतक्या विविध ठिकाणांहून आलेल्या माहितीचे धागे एकत्र गुंफून संपूर्ण चित्र तयार करणे हे मानवासाठी आव्हानात्मक असते. डेटा सायन्स मात्र या माहितीतील पॅटर्न ओळखते, विविध काळांची तुलना करते, आणि कोणत्या स्थळी उत्खननाची सर्वात जास्त शक्यता आहे याचे शास्त्रीय अंदाज मांडते. यातून इतिहासाचा अभ्यास फक्त रोमांचक नाही तर अधिक तर्कसंगत आणि विश्वसनीय बनतो.

आज या पुरातत्त्वीय संपदेचा अर्थ अधिक खोलवर समजून घेण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( आर्टिफिशियल इंटेलिजेन्स) आपल्यासाठी एक नवी दारे उघडते आहे. ड्रोन, उपग्रह प्रतिमा आणि जमिनीखालील तपासणी या सर्वांतून गोळा होणारा माहितीचा महासागर एआय काही क्षणांत वाचून दाखवते. एखादे नाणे कोणत्या काळातील, एखाद्या भिंतीवरील शिलालेखाचा अर्थ काय, किंवा भग्न झालेला किल्ला मूळात कसा दिसत असेल या सगळ्यांची उत्तरे एआय आज अधिक अचूकतेने देऊ शकते. 3D तंत्रज्ञान आणि व्हर्च्युअल रियालिटी साथ मिळाल्यावर तर भूतकाळाची शहरं आपल्या डोळ्यांसमोर पुन्हा जिवंत उभी राहिल्यासारखी वाटतात.आणि याच ठिकाणी आपल्यावर विशेषतः विद्यार्थ्यांवर आणि समाजावर एक सुंदर जबाबदारी येते. 

हा वारसा फक्त संग्रहालयात बंद ठेवण्याची वस्तू नाही; हा आपल्या ओळखीचा, आपल्या संस्कृतीचा श्वास आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने तरुणांनी या इतिहासाचा अभ्यास करावा, त्याला नवीन अर्थ द्यावा आणि त्याचे जतन करण्यास हातभार लावावा. प्रत्येक पिढीने भूतकाळाकडून शिकून पुढची वाट निर्माण केली, तसेच आता ही वाट तंत्रज्ञानाच्या साथीने अधिक प्रकाशमान करता येऊ शकते.

  अजिंक्य डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग, पुणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभाग प्रमुख लेखक डॉ. भाग्यश्री ढाकुलकर, डॉ. विशाल पुराणिक, प्रा. अरविंद गौतम यांनी लेख तयार करून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या वारशाचा शोध घ्यावा, त्याचे रक्षण करावे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याला जिवंत ठेवावे यातूनच भारताच्या इतिहासाला आणि विज्ञानाला नवी ऊर्जा मिळेल असे त्यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments