Type Here to Get Search Results !

Alandi आळंदी नगरपरिषद उपाध्यक्ष पदी सुजाता तापकीर बिनविरोध

स्वीकृत सदस्य पदी राहुल चिताळकर पाटील, संदीप रासकर बिनविरोध 

माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचा अर्ज बाद  


  


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी नगरपरिषद उपाध्यक्ष पदी भाजपच्या सुजाता तापकीर यांची बिनविरोध निवड झाली. स्वीकृत सदस्य पदासाठी तीन अर्ज प्राप्त होते. यात माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचा अर्ज   पाच वर्ष संस्था पदाधिकारी नसल्याचे कारणाने बाद झाला. या मुळे उर्वरित दोन अर्ज आणि दोनच जागा असल्याने
 माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आणि माजी नगरसेवक संदीप रासकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. दोन्ही सदस्य ज्ञानोबा तुकाराम ट्रस्ट आळंदी देवाची या संस्थेचे पदाधिकारी आहेत. 

 आळंदी नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी विहित मुदतीत आलेला अर्ज वैध ठरल्याने एका जागेसाठी एकमेव अर्ज आल्याने उपनगराध्यक्षा पदी भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका सुजाता तापकीर यांची उपाध्यक्षा पदी निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी जाहीर केले.  

  स्वीकृत सदस्य पदासाठी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी यांच्या कडे मुदतीत आलेले अर्ज छाननीत  माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, माजी नगरसेवक संदीप रासकर आणि माजी नगरसेवक तुषार घुंडरे पाटील यांचे अर्ज दाखल होते. तुषार घुंडरे पाटील यांचे कडे अशासकीय संस्थेत काम केल्याचा पाच वर्षाचा अनुभव नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरला. मात्र ते माजी नगरसेवक असून त्यांचे कडे आळंदी नगरपरिषदेत विविध पदांवर काम केल्याचा पाच वर्षांचा अनुभव होता. त्यांनी नगरपरिषदेत गटनेते म्हणून देखील कार्य यशस्वी केले आहे. 

  उर्वरित छाननीत मंजूर दोन अर्ज आणि दोनच सदस्य पदासाठी जागा असल्याने आळंदी नगरपरिषद पहिल्या सभेत आलेल्या अहवाला वर चर्चा होऊन सभेत पीठासीन अधिकारी प्रशांत कुऱ्हाडे पाटील यांनी आळंदी नगरपरिषद स्वीकृत सदस्य पदी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आणि माजी नगरसेवक संदीप रासकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. 

  आळंदी नगरपरिषद पहिल्या सभेत सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन, स्वागत सत्कार पुस्तके भेट देत करण्यात आला. या वेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी पीठासीन अधिकारी यांना सभा कामकाजात प्रशासकीय सहकार्य केले.  नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे समर्थकांनी निवडीचे स्वागत करीत गुलाल, भंडारा, फटाक्यांची आतिषबाजी करीत शहरातून मिरवणूक काढून जल्लोष केला. माउली मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेत मिरवणूक उत्साही शांततेत पार पडली. आता नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका यांचे लक्ष विविध विषय समिती सभापती, उपसभापती, समिती सदस्य या निवडी कडे लागले आहे. येत्या पंधरा दिवसांत या निवडीसाठी विशेष सर्व साधारण सभा होण्याची शक्यता आहे.        



Post a Comment

0 Comments