Type Here to Get Search Results !

Alandi तुळापूर शाळेत ओळख ज्ञानेश्वरी उपक्रमास उत्साही प्रतिसाद

    वाचन, गायन, विवेचनातून प्रबोधन ; शालेय मूल्य शिक्षण संवर्धन, संस्कारक्षम उपक्रम उत्साहात 

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील तुळापूर धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालयात “ओळख ज्ञानेश्वरीची” या सांस्कृतिक व आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण शालेय मूल्य शिक्षण संवर्धन, संस्कारक्षम उपक्रमात आनंददायी वार दर शनिवारी, हरीपाठ वाचन, गायन तसेच ज्ञानेश्वरीतील ओव्यांचे सविस्तर विवेचन असा भक्तीज्ञानमय उपक्रम उत्साही भक्तिभावमय वातावरणात राबविला जात आहे. यासाठी तुळापुरात ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक व शिक्षकवर्ग या सर्वांनी एकत्र येत या उपक्रमाला मोठा प्रतिसाद देत उपक्रम यशस्वी करीत स्वीकारला आहे.                     

  श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार आळंदी यांच्या विशेष मार्गदर्शनात हा उपक्रम राज्यातील दीडशेवर शाळांत तसेच तुळापूर गावात देखील सुरु आहे. तुळापूर येथे ग्रामस्थ बापूसाहेब शिवले यांनी शनिवारी ( दि. १० ) हरीपाठाचे सुस्वर वाचन, गायन करीत भक्तीरसपूर्ण स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तीभावाने उजळवला. या उपक्रमाचे खास आकर्षण इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कु. अमृता बापूसाहेब शिवले हिने सादर केलेले संत वाड्मयीन विवेचन हे ठरले. निवडक भावार्थ, त्यातील तत्वज्ञान, आधुनिक जीवनाशी असणारा संबंध आणि संतांचे व्यापक सामाजिक योगदान या सर्व मुद्द्यांचा प्रभावी, समर्पक आणि सुटसुटीत मांडणी तिने करत सादर  केली. तिचे वक्तृत्व, अभ्यासपूर्ण तयारी आणि आत्मविश्वास याचे सर्वत्र कौतुक झाले.

  या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात मुख्याध्यापक आबा जाधव यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ओळख ज्ञानेश्वरीची’ हा उपक्रम सतत प्रभावीपणे राबविला जात असून विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची जाण, वाचनाची आवड व मूल्यशिक्षणाची जडणघडण अधिक बळकट होत आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना संत साहित्याचे सातत्यपूर्ण अध्ययन व मनन याचे महत्त्व सांगितले. 

  विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थांनी एकजुटीने सहकार्य करून उपक्रम दर शनिवारी राबविला जात आहे. यातून गावात शैक्षणिक तसेच अध्यात्मिक बैठक तयार झाली आहे. या उपक्रमातुन ज्ञानेश्वरींचे वाचन, मनन विद्यार्थ्यांच्या भाव विश्वाला नवीन दिशा देत असून विद्यालय भविष्यातही अशा उपक्रमांची मालिका राबविणार असल्याचे मुख्याध्यापक आबा जाधव यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments