Type Here to Get Search Results !

Baramati विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू

धक्कादायक ! महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार विमान अपघातात मृत्युमुखी  

  

पुणे ( अर्जुन मेदनकर ) : राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री अजितदादा पवार यांच्या
विमानाला बारामती येथे लँडिंग होत असताना दुर्दैवी अपघात झाला. या विमान अपघातात अजितदादा पवार यांचे सह ६ जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी अपघातात विमान जळून खाक झाले असून राज्यात सर्वात मोठी  दुःखद आणि धक्कादायक बातमीने महाराष्ट्र राज्यात एकच शोककळा पसरली. राज्यातून अजितदादांच्या हजारो समर्थक बारामतीत दाखल झाले असून बारामतीत गुरुवारी ( दि. २९ ) त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक शहरे, गावे, पुणे शहर येथे शोककळा पसरली असून गुरुवारी अनेक ठिकाणी बंद जाहीर करण्यात आला आहे. या दुर्दैवी अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसह खाजगी सुरक्षा रक्षक विदिप जाधव,पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू झाला आहे.  

अतिशय दुर्दैवी घटना 

महाराष्ट्राचा बुलंद आवाज व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी डीजीसीए यांनी केली आहे. बुधवारी ( दि. २८ ) ते सकाळी मुंबई वरून बारामतीकडे विमानाने निघाले होते. बारामती या ठिकाणी लँडिंग दरम्यान विमानाला अपघात झाला आणि या मध्ये त्यांच्यासह सहा जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. या मुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. अजित पवार सारखा करारी नेता अशा विमान अपघातामधून गेल्याची हळूहळू सर्वच स्तरांमध्ये व्यक्त होत आहे. राज्यातील राजकारणावर प्रचंड पकड असणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वच जण स्तब्ध हतबल झालं निशब्द झाले आहे.  अत्यंत कर्तृत्ववान, धोरणी, स्पष्टवक्ता राजकारणी म्हणून अजित दादाची एक वेगळी ओळख, एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्र अनुभवत आहे. दादांच्या अशा जाण्याने एक प्रचंड राजकीय पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरून न येणारी आहे. 

दादा गेले !  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

जमिनीशी घट्ट नाळ असलेले जननेते, माझे मित्र आणि सहकारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची घटना मनाला अत्यंत व्यथित करणारी आहे. मनाला चटका लावणारी आहे. मन सुन्न झाले आहे. भावना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

माझा दमदार आणि दिलदार मित्र मी गमावला आहे. माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे. हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अतिशय कठीण आहे. मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या अपघातात अन्य ४ जणांचा मृत्यू झाला. त्यांच्याही कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी सांगितले.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत आले. राज्यात शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. 

                     

                     उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना तीव्र दुःख 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधना बद्दल राज्यपालांना तीव्र दुःख झाले. महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधना बद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे तीव्र दुःख झाले. दिवंगत अजितदादा पवार यांच्या आत्म्यास ईश्वर सद्गती देवो व पवार यांच्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना आणि असंख्य समर्थकांना हा दुखद प्रसंग सहन करण्याचे धैर्य प्रदान करो, ही प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

विमान अपघातात पवारांचा मृत्यू झाला ; या प्रकरणी चौकशी करणार ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी त्यांचे सहकारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले निधन दुःखद आणि दुर्दैवी असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, ज्या विमान अपघातात पवारांचा मृत्यू झाला त्याची चौकशी केली जाईल.

एकनाथ शिंदे यांनी पवार यांच्या योगदानाचे कौतुक केले, ज्यांनी विविध मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी म्हणून काम केले आणि २०२२ ते २०२४ पर्यंत शिंदे यांच्या नेतृत्वा खालील महाराष्ट्र सरकार मध्ये उपमुख्यमंत्री म्हणूनही काम केले. ते म्हणाले, ही एक अतिशय वेदनादायक घटना आहे. महाराष्ट्रासाठी खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे. विमान अपघाताची चौकशी केली जाईल. शिंदे म्हणाले, ही केवळ पवार कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण राज्यासाठी एक मोठे नुकसान आहे. मला वाटतंय की मी माझा मोठा भाऊ गमावला आहे. बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात ६६ वर्षीय पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झाला. शिंदे म्हणाले की, पवार हे एक शुद्ध मनाचे आणि सरळ नेते होते ज्यांची प्रशासनावर चांगली पकड होती.

स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर ; गुरुवारी अंत्यसंस्कार  

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजितदादा आशाताई अनंतराव पवार यांचे बुधवारी ( दि. २८ ) दुःखद निधन झाले आहे. या मुळे महाराष्ट्रात २८ ते ३० जानेवारी २०२६ या तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, असे सामान्य प्रशासन विभाग ( राजशिष्टाचार ) विभागा मार्फत कळविण्यात आले आहे.

 या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमित पणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येईल. तसेच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे बुधवारी बारामती येथील विध्या प्रतिष्ठान चे प्रांगणात अंत्यविधी होणार आहे. माध्यमांना देखील सूचना करण्यात आल्या आहेत. उद्या ( गुरुवारी ) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अंत्यविधीच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारचे ड्रोन उडविण्यात येऊ नयेत. अंत्ययात्रा व अंत्यविधीचा कार्यक्रम शांततेत व सन्मान पूर्वक पार पडावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन पुणे जिल्हा प्रशासना तर्फे करण्यात आले आहे. 

आळंदीत माऊली मंदिर परिसरात बंद ; भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण  

महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अकाली जाण्याने मन सुन्न झाले. अतिशय कर्तबगार, कार्यक्षम व प्रेरणादायी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्या आड गेले. त्यांचे निधनाने प्रचंड मोठी पोकळी निर्माण झाली. जी कधी हि भरून येणार नाही. पवार कुटुंबियांचे दुःखात सर्व आळंदीकर ग्रामस्थ सहभागी आहे. आळंदीतील व्यापारी मंडळ, अखिल भाजी मंडई मंडळ, आळंदी जनहित फाउंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान आळंदी, आळंदी ग्रामस्थ, आळंदी शहरातील व्यापारी बांधव सर्व घटकांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली बुधवारी ( दि. २८ ) अर्पण करण्यात आली. माऊली मंदिर परिसरासह भराव रस्त्यावरील व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली. 

गुरुवारी आळंदी बंद रहाणार ; ग्रामस्थांचे वतीने आवाहन   

महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री सर्वांचे लाडके अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाल्याचे समजताच तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये शोककळा पसरली. माऊली मंदिर परिसरातील तसेच भराव रस्त्यावरील व्यावसायिक आस्थापना प्रसाद विक्रेते पथारीधारक विक्रेते यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून आदरणीय दादांना आळंदी ग्रामस्थ, व्यापारी यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पुणे जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार हरपल्याची भावना व्यक्त करीत जिल्हा दादांच्या जाण्याने पोरका झाला आहे. 

आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी ( दि. २९ ) आळंदी बंद ठेवण्यात येत आहे. या बंद मधून आरोग्य सेवा, मेडिकल, अत्यावश्यक सेवा, भाजी पाला वगळता आळंदीतील व्यापारी दुकाने, आस्थापना गुरुवारी बंद राहणार आहेत. या साठी आळंदी तील  व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, टपरीधारक यांनी आपापल्या आस्थापना स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्याचे आवाहन आळंदी ग्रामस्थ, आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments