स्वयं अध्ययनाचे शालांत परीक्षेत महत्त्व- विद्यार्थी मित्रांनो कसे कराल स्वयं अध्ययन ?
स्वयंअध्ययन करताना सर्वात महत्त्वाचे आहे - पाठ्यपुस्तक !
पाठ्यपुस्तकाचे सखोल व नियमित वाचन हे तुम्हाला शंभर टक्के यशाकडे नेणारे आहे. दैनंदिन अध्ययन केल्याचे समाधान हे केवळ आणि केवळ पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटक समजून घेतल्यामुळे लाभणार आहे. स्वयं अध्ययनासाठी प्रत्येक विषयाच्या कौशल्यांवर भर द्यावा लागणार आहे. भाषा विषयासाठी श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, अभिव्यक्ती आणि विश्लेषण या कौशल्यांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांचा सराव करावा लागेल.
विज्ञान व भूगोल या विषयांसाठी वरील सर्व कौशल्यांबरोबरच निरीक्षण, निष्कर्ष, अनुमान तसेच आकृतीचे आकलन महत्त्वाचे आहे. गणितामध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता, क्रमबद्धता व अचूकता महत्त्वाची आहे. वाचनाबरोबर टिपण काढणे हे स्वयं अध्ययनामधील अतिशय महत्त्वाचे कौशल्य आहे.
पाठ्यपुस्तकातील पाठ्य घटकाचे मुकवाचन करीत असताना महत्त्वाच्या वाटणाऱ्या शब्दांना पेन्सिलने अधोरेखित करणे त्याच वेळी महत्त्वाचे वाटणारे शब्द तथा मुद्दे यांचा सहसंबंध असलेल्या आकृत्या काढून, ओघ तक्ते काढून त्याच्या नोंदी वहीमध्ये ठेवता येतील. आकृती पाहिली की सर्व मुद्दे पटकन नजरेच्या टप्प्यात येतील आणि परिच्छेद लिहिण्यापेक्षा असे टिपण व घटक लक्षात राहण्यासाठी प्रभावी ठरतील.
सर्व घटक अशा पद्धतीने समजून घेतल्यानंतर स्वाध्याय सोडविणे महत्त्वाचे आहे. न समजलेला भाग सहअध्यायी, शिक्षक, पालक यांच्याकडून समजून घ्यायचा आहे. नम्रपणे शंका विचारायला अजिबात घाबरायचं नाही.लिहिलेल्या नोंदींचे म्हणजे टिपणांचे वाचन पुन्हा पुन्हा करणे आवश्यक आहे. मागी परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव वेळ लावून प्रामाणिकपणे करायचा आहे. स्वयं अध्ययनामध्ये स्वतःशी प्रामाणिक राहिले तर यश उत्तम मिळते.
सर्व विषयांना समान महत्त्व आहे ज्या विषयामधील जो पाठ्य घटक समजला नाही त्याच्या सरावाला जास्त वेळ द्यायचा आहे. सत्र एक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवरून विद्यार्थ्यांचा स्वतःचा किती अभ्यास झालेला आहे हे त्यांना लक्षात आलेले असेलच. आता महत्त्वाचे आहे ते म्हणजे सर्व पाठ्यघटक मन लावून वाचणे आणि ज्या प्रश्न प्रकारामध्ये गुण कमी मिळाले त्या प्रश्न प्रकाराचा सराव करणे. स्वयंअध्ययनामुळे विद्यार्थी मित्रांनो आत्मविश्वास नक्कीच वाढेल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर तुमची जी अंत:प्रेरणा आहे ती तुम्हाला अधिक अभ्यास करण्यापासून रोखणार नाही. यश तुमचेच असणार आहे! तुम्हाला शालांत परीक्षेसाठी मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !!
सौ हर्षा बाळकृष्ण पिसाळ (निगडे) राज्य पुरस्कार प्राप्त सहाय्यक शिक्षिका, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, डेक्कन पुणे.

Post a Comment
0 Comments