Type Here to Get Search Results !

आळंदीत राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण दिनी भजन प्रार्थना

                                         महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजन अभिवादन सभा 

 


आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राष्ट्रपिता महात्मा गांधी रक्षा विसर्जन स्मृती दिना निमित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि नगरपरिषद आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने 'राष्ट्रपित्याचे पुण्यस्मरण' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आळंदी येथे इंद्रायणी नदी घाटावरील रक्षा विसर्जन स्तंभ येथे गुरुवारी ( दि. १२ ) भजन, सर्व धर्मप्रार्थना, अभिवादन सभा परंपरेने झाली. 

 या वेळी धनंजय पवार आणि मोहिनी पवार यांचे सुश्राव्य आवाजात सर्वधर्म प्रार्थना, भजन सेवा रुजू झाली. या प्रसंगी आळंदी नगरपरिषद नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पदाधिकारी प्रवीण सप्तर्षी, अन्वर राजन, आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त अर्जुन मेदनकर, सामाजिक कार्यकर्ते कालिदास तापकीर, डी. के. कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नागरिक, भाविक उपस्थित होते. अभिवादन सभेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार, आचार, आदर्श डोळ्या समोर ठेवत अहिंसा संवर्धन, सर्वधर्मसमभावाचा संदेश देत रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे पुष्पांजली आणि अभिवादन करीत आदरांजली उपस्थित मान्यवरांनी अर्पण केली.  

  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या  हत्ये नंतर  महात्माजींच्या इच्छे नुसार त्यांच्या अस्थी रक्षेचे भारतातील प्रमुख नद्यां प्रमाणे इंद्रायणी मध्ये रक्षा विसर्जन कलरण्यात आले होते. एका कलशातील अस्थी रक्षेचे विसर्जन आळंदी येथील इंद्रायणी नदीत १२ फेब्रुवारी १९४८ रोजी करण्यात आले. त्यांची स्मृती म्हणून रक्षा विसर्जन स्तंभ उभारण्यात आला. दरवर्षी १२ फेब्रुवारी रोजी आळंदी येथे गांधीजींना अभिवादन करण्यात येते. ७८ वर्ष ही परंपरा सुरु आहे.

Post a Comment

0 Comments