अलंकापुरीत महात्मा गांधीजीच्या रक्षा विसर्जन स्तंभास धोका
तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून सांडपाणी वाहिनीस दगडी घाटाची तोडफोड
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील देहू आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून विकसित झालेल्या दगडी घाटाची जेसीबीच्या मदतीने सरळ ब्रेकर लावून ड्रेनेज नालीसाठी खोदकाम सुरू करण्यात आले आहे. आळंदी शहरातील सांडपाणी बंदिस्त नाल्यातून नेण्यासाठी सुरू असलेल्या या कार्यामुळे पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका निर्माण होऊ शकतो. तसेच येथील राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या रक्षा विसर्जन स्तंभास ही धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने हे कार्य थांबवून योग्य नियोजन करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थ व वारकर्यांनी केली आहे.
यासाठी माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे, श्रीक्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती आणि विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीक्षेत्र आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर करोडो रुपये खर्च करून लक्षवेधी घाटाचे काम करण्यात आले आहे. या माध्यमातून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहे. या घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्या करिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांना संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांच्याशी चर्चा न करता रात्रीच्या वेळी या घाटाचे बांधकाम जेसीबी मशीन ने तोडफोड व खोदकाम केल्याने भाविक, नागरिकांसह विविध सेवाभावी संस्था यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आळंदी शहरातील सांडपाणी पुंडलिक मंदिरा लगत उघड्यावार वाहत होते. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून ते बंदिस्त करण्याचे कार्य सुरू आहे. ही सांडपाणी वाहिनी पुढे एसटीपी प्रकल्पास जोडली जाणार आहे. परिणाम सांडपाणी नदीत मिसळणार नाही. त्यामुळे सांडपाणी वाहिनीचे काम झाल्यावर घाटाचे काम पूर्ववत नगरपरिषदेकडून केले जाईल असे बांधकाम अभियंता सचिन गायकवाड यांनी सांगितले.
या संदर्भात माईर्स एमआयटीचे संचालक डॉ. महेश थोरवे म्हणाले, संस्थेने ज्या पद्धतीने दगडी घाट बांधकाम केले आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात महापूराच्या स्थितीमध्ये संपूर्ण घाटास धोका होऊ शकतो. यामुळे घाट खचून जीवितहानी होण्याची भिती आहे. तसेच या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांचे रक्षा विर्सजन स्तंभास धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे हे खोदकाम थांबवून पर्यायी मार्ग काढावा.
श्रीक्षेत्र आळंदी परिसर विकास समितीच्या माध्यमातून साधारण ३५ ते ४० वर्षापासून आजपर्यंत संस्थेने अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने नदीच्या पूराचे पाणी व सांडपाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन करून इंद्रायणी नदीच्या तीरावर कोट्यावधी रूपये खर्च करून सार्वजनिक हितासाठी पर्यावरण सुधार आणि प्रदूषण नियंत्रण या दृष्टीकोनातून नियोजन बद्ध दगडी घाट बांधण्यात आले आहेत. या दगडी घाटाच्या खालून सांडपाणी वाहून जाण्या करिता स्वतंत्र भूमिगत गटरचे नदीपात्राच्या कडेने बांधकाम करण्यात आले आहे. असे असतांनाा संस्था किंवा संस्थेचे अधिकारी यांचेशी चर्चा न करता रात्रीच्या वेळेसे जेसीबीच्या मदतीने दगडी घाटाचे बांधकाम फोडण्याचे काम करण्यात आले.
या घाटावर संस्थेतर्फे असलेल्या सुरक्षा रक्षक व सुपरवायझर यांनी नगरपरिषदेचे कर्मचारी यांच्याकडे विचारणा केली. त्यावेळी हे लक्षात आले की डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि. या खाजगी बांधकाम कंपनीतर्फे हे कार्य सुरू आहे. गेल्या ३५ वर्षापासून या घाटाचे बांधकाम करीत असतांना याबाबत काहीही कल्पना न देता अंधारात रात्रीच्या वेळी घाटाचे दगडी बांधकाम फोडण्याचे काम चालू केले. संस्थेच्या सुरक्षा रक्षकांनी सदरचे काम रात्रीच्या वेळी त्वरीत बंद करण्यास सांगितले. मात्र या कडे दुर्ल्क्ष करून दुसर्या दिवशी ही पुन्हा रात्रीच्याच वेळी घाटाचे बांधकाम जेसीबी मशीनने तोडण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. यामुळे आळंदीत या कामा बाबत मोठी नाराजी आहे.
आळंदी-देहू परिसर विकास समितीचे अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड यांनी देणगी गोळा करून आळंदीत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावर दगडी घाटाचे बांधकाम केले. आळंदीचे सौंदर्य उजळले. त्यातच तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून घाटावर शनि मंदिर ते पुंडलिक मंदिर परिसरात सांडपाणी वाहनू नेणार्या वाहिनीच्या कामासाठी खोदकाम सुरू केले आहे. येथे राजस्थान येथून आणलेला लाल दगड आणि संगरमवरी दगडाची तोडफोड करण्यात आली आहे.
भागिरथी नाल्याचे सांडपाणी वाहून नेणारी मोठी जमिनी खालची वाहिनी असताना शेजारीच अन्य सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी तयार केली जात आहे. यासाठी इंद्रायणी काठचा दगडी घाट तोडला आहे. यामुळे वारकर्यांमध्ये नाराजी आहे. एखाद्या स्वयंसेवी संस्थेने चांगला घाट बांधून दिला. त्याची निगा राखण्या ऐवजी तो अधिकाधिक दुरावस्थेत कसा राहू शकतो. असा प्रयत्न नगरपरिषदे तर्फे सुरु आहे. केवळ विकास कामासाठी उपलब्ध निधी खर्ची टाकण्याचा घाट यातून सुरु असून विकासाचे नावाखाली शासनाचे निधीची केवळ उधळपट्टी सुरु आहे. हे काम तात्काळ रोखण्याची मागणी आळंदीत जोर धरत आहे. या संदर्भात पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र डुडा यांचे कडे देखील तक्रार करण्यात आली आहे.
.jpg)


Post a Comment
0 Comments