भिगवणचे तुषार धुमाळ यांचा दुर्दैवी मृत्यू
प्रतिनिधी / वर्षा चव्हाण : अकलूज (जि. सोलापूर) अकलूज येथील प्रसिद्ध सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये रविवारी एक भीषण अपघात घडला. फिरता पाळणा (रायड) अचानक निसटून पडल्याने त्यामध्ये बसलेले पर्यटक गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत इंदापूर तालुक्यातील भिगवणचे तुषार धुमाळ (वय अंदाजे ३५) यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.तूषार धुमाळ हे विमा प्रतिनिधी होते. आपल्या काही सहकाऱ्यांसह एकदिवसीय पर्यटनासाठी ते सयाजी राजे वॉटर पार्कमध्ये आले होते. दरम्यान, फिरत्या पाळण्यात बसलेले असताना पाळणा अचानकपणे तांत्रिक बिघाडामुळे निसटला आणि जोरात खाली कोसळला. या दुर्घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये तुषार धुमाळ यांचा समावेश होता. जखमींना तातडीने अकलूज येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र धुमाळ यांचा मृत्यू उपचारांपूर्वीच झाला.
हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर प्रशासनाची आणि पोलिसांची धावपळ उडाली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासास सुरुवात केली आहे. वॉटर पार्कमधील सुरक्षा उपाययोजना, देखभाल व दुरुस्ती यांची योग्यरीत्या अंमलबजावणी झाली होती का? हे तपासण्यासाठी चौकशी सुरू आहे.
या अपघातामुळे पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एडव्हेंचर पार्क्स आणि वॉटर पार्क्समध्ये वापरली जाणारी यंत्रसामग्री, झुलते पाळणे व इतर उपकरणे यांची काळजीपूर्वक तपासणी आणि देखभाल केली जात आहे का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सदर घटनेने भिगवण आणि अकलूज परिसरात हळहळ व्यक्त होत असून, धुमाळ यांचे कुटुंब व मित्र परिवार शोकाकुल झाला आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
.jpeg)
Post a Comment
0 Comments